Pune Crime : पुणे: पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. भरदिवसा आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून झालेल्या या अपहरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अपहरण करणारा मुख्य आरोपी हा पीडित तरुणीचा शेजारी असून गेल्या एका महिन्यापासून दोघांमध्ये संपर्क होता, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. (Bhigwan kidnnaping Case)

मंगळवारी दुपारी तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी जात होती. हॉटेल आनंदच्या मागील भागात पोहोचताच एका चारचाकी वाहनातून आलेल्या दोन आरोपींनी त्यांना अडवले. अचानक झालेल्या हल्ल्यात आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि लाकडी काठीने मारहाण केली. आई आणि भाऊ वेदनेत असतानाच आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी आणि पीडित तरुणीचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर दोघांमध्ये मागील एका महिन्यापासून सातत्याने फोनवर संपर्क असल्याचे समोर आले. शेजारी राहात असल्यामुळे त्यांची ओळख होती, मात्र संवादाचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर धाडी टाकण्यासाठी 6 पथके वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाठवण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी ज्या मार्गाने पळाले तो सुमारे 165 किलोमीटरचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.







