मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण (Maharashtra Politics) आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यातील ‘नंदनवन’ बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, या भेटीमागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Breaking News)

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकालांवर तसेच काही शासकीय विषयांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर संवाद झाल्याचे सांगितले जाते. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट ही स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे या भेटीत आक्षेपार्ह असे काही नाही. यामागे काही राजकीय किंवा शासकीय कारण असू शकते.”
गेल्या चार वर्षांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वेळा अधिकृत तसेच अनौपचारिक भेटी झाल्या आहेत. 2022 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले होते. त्यानंतर चित्रपट मुहूर्त, विधानभवनातील अधिवेशन, गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतरची सदिच्छा भेट, बीडीडी चाळ पुनर्विकासाचा मुद्दा, तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला होता.
सत्तांतरानंतरच्या काळात दोघांमध्ये सातत्याने संपर्क राहिल्याचे चित्र दिसते. 2023 ते 2026 या काळात विविध निमित्ताने 10 ते 15 पेक्षा अधिक वेळा त्यांची भेट झाल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. त्यामुळे आजची भेट ही पूर्णपणे अनपेक्षित नसली तरी निवडणुकांनंतरच्या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर तिचे महत्त्व वाढले आहे.
या भेटीनंतर कोणतेही संयुक्त निवेदन जारी करण्यात आलेले नसले तरी आगामी राजकीय हालचालींवर त्याचा परिणाम होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






