मुंबई: अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू (Iran-Israel War) असलेल्या भीषण युद्धाला 40 दिवसांनंतर अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. बुधवारी दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला मान्यता दिली. या काळात अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होणार आहे. तसेच इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज खुला करण्यासही सहमती दर्शवली आहे. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र युद्धविराम लागू होऊन 24 तासही झाले नाहीत, तोच परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली आहे. पाकिस्तानने सुचवलेल्या प्रस्तावात इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ले थांबवावेत, अशी अट होती. पण इस्त्रायलने ही अट मान्य केली नाही. आमचा युद्धविराम हा फक्त इराणसोबत आहे, लेबनॉनवर कारवाई सुरूच राहील, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले होते.

युद्धविरामानंतर लगेचच इस्त्रायलने लेबनॉनवर मोठा हल्ला केला. सुमारे 50 फायटर जेटच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला. यात जवळपास 160 बॉम्ब टाकण्यात आले. हिज्बुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त हिज्बुल्लाह सदस्य मारले गेल्याची माहिती आहे. तसेच अनेक सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक जण जखमी झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
या हल्ल्यानंतर लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी इतर देशांकडे मदतीची मागणी केली आहे. युद्धविरामाचे स्वागत असले तरी आमच्यावर हल्ले सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराणनेही लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास युद्धविराम मोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या संघर्षाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







