मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.
नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील असा दावा केला होता. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस देखील ठेवले आहेत.
दरम्यान, राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, ही अटकळ अखेर खरी ठरताना दिसत आहे.
काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी कमकुवत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नाना पटोले दिल्लीला रवाना
अशोक चव्हाण यांनी दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नाना पटोले हे रायपुरहून दिल्लीला जाणार आहेत. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत भाजपात जाणाऱ्या काही नेत्यांमुळे राज्यात किती फरक पडणार, राजकीय स्थिती काय असेल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.