मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. मंत्रालयात आज ही बैठक पार पडली. त्यात दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शिवडी न्हावाशेवा टोल, दुधासाठी अनुदान, वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अशा अनेक मुद्यांवर निर्णय घेण्यात आले.
नगरविकास विभागाकडून अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आलाय. दुग्धव्यवसाय विकासात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात आले आहे. जलसंपदा विभागात विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेची अट शिथिल करण्यातआली आहे.
वित्त विभागात मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्यात येणार आहे. पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान ४०० उद्योगांना फायदा देणार आहे. वस्त्रोद्योगात रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना राबविणार आहेत. रेशीम शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
त्याशिवाय, उद्योग विभागात द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार आहेत. परिवहन विभागात नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार आहेत. त्यासाठी ७५० कोटींची मान्यता प्राप्त झाली आहे. सहकार विभागात सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला जाणार आहे.