मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण महायुतीसाबोतच राहणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महादेव जानकर यांचा हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरला आहे.
दरम्यान, आज रविवारी महादेव जानकर आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच या बैठकीमध्ये महायुतीने रासपला एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
महादेव जानकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत, असं जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
महादेव जानकर काय म्हणाले?
महादेव जानकर म्हणाले की, मी भाजपवर नाराज होतो, पण आता एक जागा आम्हाला दिली आहे. त्यामुळे नाराज नाही. एक ते दोन दिवसात कळेल, मला कुठली जागा देणार आहे. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. मी महविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या, पण ते एकच देत होते. भाजप सुद्धा मला एक जागा देत आहे म्हणून मी महायुतीत सामील झालो असल्याच जाणकारांनी सांगितलं.