मुंबई : मुंबई : जनतेला न्याय मिळेल, असा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल. लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा निर्णय हा मॅजोरिटी मॅटर असतो. त्यामुळे जो कायद्यात आणि संविधानात तरतुदी असतील त्या सर्वांचे पालन करून जननेतला अपेक्षित असणार आणि कायद्यानुसार आपण निर्णय देऊ, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर केले आहे. ते आज १२ नोव्हेंबरला मुंबईत दिवाळीनिमित्त एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे बोलताना म्हणाले, राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, जनसामान्यांना अपेक्षित निर्णय होणं गरजेचं आहे. लोकशाहीत असे निर्णय होत असताना ते संवैधानिक चौकटीत व्हायला पाहिजेत. असेही त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या पंधरा आमदार यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेन्याच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अपात्रेतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.
मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने सरन्यायाधीशांनी कडक शब्दांत विधानसभा अध्यक्षांची कानउघडणी केली होती. तसेच, नार्वेकरांचे वकिल देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करून वेळापत्रक ठरविण्याची सूचना केली होती. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय येत्या ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.