मुंबई: ससून हॉस्पिटल ड्रग्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ललित पाटीलला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नईतून त्याला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील हा पसार झाला होता. यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला पळून गेल्याचं सांगण्यात येत होते. पुणे पोलिसांची शोध पथके त्याच्या मागावर होती. पुणे पोलिसांसह मुंबई पोलिसही पाटीलच्या शोधात होती. मुंबई पोलिसांनीच नाशिक जिल्ह्यातील ललित पाटीलचा ड्रग्स कारखाना काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला होता.
मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली असल्याची माहिती मिळत आहे. या अटकेबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. कारण, हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. ललित पाटील पळून जाण्यामागे राजकीय नेत्याचा हात होता, असा आरोप करण्यात आला. राजकीय नेत्याच्या आशीर्वादानेच पाटीलला ससूनच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे म्हटलं जात होते. आता साकिनाका पोलिसांच्या पथकाने ललित पाटीलला चेन्नईत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटील हा पुण्यातून गुजरातला गेला होता. तिथे त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्स गाडी भाड्याने घेतली. त्या वाहनाने पुढे तो कर्नाटकात गेला आणि त्यानंतर तो चेन्नईला पोहचला. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये कारवाई केली तेव्हा पाटीलच्या एका निकटवर्तीयाला देखील अटक करण्यात आली होती. परंतु याची कुठलीही माहिती माध्यमांना लागून दिली नाही. पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीला ललित पाटीलचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ललित पाटीलशी बोलायला सांगितले. त्यानंतर ललितने तो कसा फरार झाला, कुठून कसा गेला हे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाठलाग करून ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली.