मुंबई : मुंबईतील जेजे रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी १८ डिसेंबर (आजपासून) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजे रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्याकडून मानसिक छळ होत असून अनेक रुग्णांवर त्यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे या रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, असा आरोप करत डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूचे डेथ ऑडिट करण्याची मागणीही डॉक्टरांकडून केली जात आहे.
दरम्यान, याबाबतचे पत्र निवासी डॉक्टरांच्या संघटना सेंट्रल मार्ड आणि जेजे मार्डने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजश्री सापळे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव आणि आयुक्तांना देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. डॉ. कुरा यांना तात्काळ हटवण्याची मागणीही या पत्रात केली आहे. तसेच निवासी डॉक्टरांना एमडीच्या अंतिम परीक्षेत ‘नापास’ करण्याच्या धमक्या देखील सतत दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर ठाम
रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेले सामुदायिक रजा आंदोलन करू नये अशी विनंती प्रशासनाने केली आहे. मात्र निवासी डॉक्टर रजा आंदोलन निर्णयावर ठाम असल्याचं रूग्णालयातील मार्डच्या सदस्यांनी सांगितलं. विभागातील निवासी डॉक्टरांनी विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्याविरोधात मानसिक छळाची तक्रार केली आहे.
यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी चौकशीचे आश्वासन देखील दिले होते. पण कारवाई न झाल्याने या डॉक्टरांनी डॉ. कुरा यांना तत्काळ न हटवल्यास सामुदायिक रजेवर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.