मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रातील वीर सावरकरांविषयीच्या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुस्तकाच्या प्रती आणि काही छायाचित्रे फाडण्यात आली. मात्र, या निषेधादरम्यान शायना एनसी यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो अनावधानाने फाडला गेल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या सहा प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील सावरकरांविषयीच्या उल्लेखावर आक्षेप नोंदवला. यावेळी त्यांनी पुस्तकाच्या प्रतींसह काही छायाचित्रे फाडून निषेध व्यक्त केला. या छायाचित्रांमध्ये बाळासाहेब ठाकरे हे मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारत असल्याचा फोटोही होता. निषेधादरम्यान शायना एनसी यांच्याकडून हा फोटो फाडला गेल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी फोटो फाडणे थांबवल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे वृत्त आहे.
या वादावर शायना एनसी यांनी स्पष्टीकरण देताना आरोप फेटाळले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून, त्यांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे त्यांनी म्हटले. तसेच, आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. एकदा नव्हे, तर दहा वेळा फाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून खोटा नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी पत्रकार परिषदेचा व्हिडीओ नीट पाहण्याचे आवाहन केले.

या घटनेचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता बाळासाहेबांच्या छायाचित्राच्या कथित अवमानावरून नव्या राजकीय संघर्षात बदलताना दिसत आहे.







