पुणे : सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील काही संदर्भांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विद्यमान केंद्र सरकारबाबत केलेल्या टिप्पण्यांवरून सत्ताधारी शिंदे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या पुस्तकातील मजकुरामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे. सावरकरांच्या कार्याचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करून त्यांचा अनादर करण्यात आला असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या निषेधार्थ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे पुस्तक फाडून आपला रोष व्यक्त केला आणि या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
पुस्तकात सावरकरांबद्दल नेमके काय म्हटले आहे?

सोनिया गांधींच्या या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्यातील काळाचा संदर्भ देत, काँग्रेसचे कार्यकर्ते इंग्रजांचा मार सहन करत असताना सावरकर ब्रिटिश सत्तेला दयेचे अर्ज पाठवत होते, असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, सावरकर हे हिंदुत्व या विचारसरणीचे जनक होते आणि त्यांना भारताला असे राष्ट्र बनवायचे होते जिथे हिंदूंना सर्वोच्च स्थान असेल, असे पुस्तकात नमूद केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या मित्रसंघटना ज्या विचारधारेचे समर्थन करतात, ती विचारधारा जुन्या काळातील आदर्श समाजाच्या कल्पनेवर आधारित असून ती पारंपरिक पितृसत्ताक पद्धती, वर्णव्यवस्था तसेच सत्ता आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाला पाठिंबा देते, अशी मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.
पुस्तकात केवळ सावरकरांवरच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याचा उल्लेख करताना, हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिखाऊ होता, असे पुस्तकात म्हटले आहे. त्या सोहळ्याच्या स्वरूपावरूनच हे सरकार भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे, याचा अंदाज आपल्याला आला होता, असे मत सोनिया गांधींनी या पुस्तकात मांडले आहे. जागतिक स्तरावर उजव्या विचारसरणीच्या सरकारांचा जो उदय झाला, त्याला भारतही अपवाद ठरला नाही, असेही त्यांनी यात नमूद केले आहे.
सध्या या पुस्तकातील विधानांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







