मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवास्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज्याचे राजकारण चांगलंच ढवळून निघाले. काल बारामतीच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. आणि आज पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, मी आज शरद पवारांकडे सकाळीच गेलो होतो. अर्थात त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. फक्त ते तिथे आहेत तेवढं कळलं होतं. त्यामुळे साडेदहा वाजता मी तिथे गेलो होतो. मात्र, प्रकृती बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक-दीड तास बाहेरच थांबलो. त्यानंतर ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपले होते. प्रकृती बरी नसल्याने ते उठले आणि बाजूला खूर्ची ठेवून आम्ही दीड तास चर्चा केली, असं छगन भुजबळ म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मला ना राजकारण करायचं, ना मंत्रीपदाची आशा आहे. राज्य शांत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठीच मी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राजकारणाबाबत कोणताही मुद्दा नव्हता. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
मराठा आरक्षण, ओबीसी वादावर तोडगा निघावा यासाठी चर्चा झाली. मराठा, ओबीसी धनगर यांच्या मागण्या काय आहेत? त्या मी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या आहेत. शरद पवार यांनीही याबाबत पुढाकार घेणार असल्याचे सांगितलं आहे. मी दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं शरद पवार मला म्हणाले, असं छगन भुजबळ यांनी सांगितले.