मुंबई: मुंबईतील दादर परिसरात मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४९ वर्षीय मुलाने आपल्या ७९ वर्षीय आईची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर दादर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना भवानी शंकर रोडवरील गॅरेज गल्ली परिसरातील ‘राम श्याम’ इमारतीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रेजिना क्रूझ फर्नांडिस (वय ७९) असे मृत महिलेचे नाव असून, एडवर्ड क्रूझ फर्नांडिस (वय ४९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलामध्ये एका किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या एडवर्डने घरातील चाकूने आईवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रेजिना यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, एडवर्ड वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होता; मात्र तो कोणत्याही नोकरीत फार काळ टिकत नव्हता. याच मुद्द्यावरून आई आणि मुलामध्ये यापूर्वीही वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच एडवर्ड ओमानहून भारतात परतल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. याशिवाय, गेल्या वर्षी त्याने आईला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी एडवर्डला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दादर पोलीस करत असून, हत्येमागील नेमके कारण, घटनेची परिस्थिती आणि आरोपीच्या पूर्वीच्या वर्तनाबाबत अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.







