पुणे : दुबई आणि अबूधाबी येथे नोकरी करणारा एक भारतीय तरुण स्वदेशी परतत असताना पुणे विमानतळावर अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असलेला मो. अफजल हा 30 जुलै 2026 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (IX-284) विमानाने दिल्लीसाठी रवाना झाला होता. ठरलेल्या वेळेनुसार 1ऑगस्ट रोजी रात्री 11.15 वाजता त्याचे विमान दिल्लीत उतरणे अपेक्षित होते.

मात्र, दीर्घकाळ वाट पाहूनही अफजल घरी न पोहोचल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली असता, अफजल दिल्लीला न जाता मध्येच पुणे विमानतळावर उतरल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पुणे विमानतळावर उतरल्यानंतर तो पुढे कुठे गेला, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी केली, परंतु त्याचा काहीही सुगावा लागला नाही. त्याचा मोबाईल क्रमांकही बंद येत असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. या प्रकरणी अफजलचा भाऊ मो. फैसल यांनी पुणे येथील विमाननगर पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ हरवल्याची तक्रार नोंदवली आहे.

2 ऑगस्ट 2026 रोजी दाखल झालेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. विमानतळा परिसरातील CCTV फुटेज तपासून आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत







