मुंबई : घसा हा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते. तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते.
खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी काही उपाय करता येऊ शकतात. जर घसा दुखत असल्यास दूध, हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण तयार करून पिण्याने घसादुखी कमी होते. तसेच लवंग चघळल्यानेही घसादुखी कमी होते. पण जर घशात जळजळ, घसा बसल्यासारखं वाटतं असेल तर वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे, बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
याशिवाय, बऱ्याचदा घसा खवखवण्याचा त्रास आपल्याला होत असतो. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.