मुंबई : राज्यात लोकसभेची धामधूम सुरू असताना आता आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात विधानपरिषदेच्या ४ जागांवर निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक व कोकण विभागामध्ये १० जूनला मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी दहा जूनला मतदान पार पडणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान, दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमोजणी होणार आहे.
विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ-ठाकरे गट), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ-भाजप), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ- ठाकरे गट) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
अशी असणार निवडणूक प्रक्रिया?
निवडणुक प्रक्रिया १५ मे पासून सुरू होणर असून इच्छुक उमेदवारांनी २२ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार आहे. तर २७ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.