Ladki Bahin Yojana Suspend : राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील जवळपास सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. मात्र, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजना थांबवण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत नवे अर्ज देखील स्वीकारण बंद करण्यात आलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्यात याव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
त्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवण्यात आला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
म्हणून त्वरित थांबवली योजना?
आचारसंहितेच्या काळात आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत बंद करण्यात यावा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली.
त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली आहे. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे.