पुणे : सणवार आणि खरेदी हे जणू समीकरणच असते. दिवाळी म्हणजे सर्व सणांचा राजा. या काळात खरेदीसाठी झुंबड उडते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाला ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. विक्रेते देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींचा वर्षाव करतात. यंदाची दिवाळीही त्याला अपवाद नाही. यंदा दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांची घसरण झाली आहे.
आज मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने १६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,२०० रुपये आहे. मंगळवारी हा दर ६१,३६० रुपये होता. त्यासोबतच २२ कॅरेट सोने १५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२५० वरून ५६,१०० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर एक हजार रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर ७४,५०० रुपयांवरून ७३,५०० रुपयांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील विविध तालुक्यांतील सोन्याचे दर
- पुणे – ६१,२०० रुपये
- नाशिक – ६१,२३० रुपये
- नागपूर – ६१,२०० रुपये
- कोल्हापूर – ६१,३६० रुपये
यंदा धनत्रयोदशीला सोने किती वाजता खरेदी करावे?
धनत्रयोदशीला सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी करणे भारतात शुभ मानले जाते. असे मानले जाते की अशा शुभ दिवशी सोने खरेदी केल्याने तुम्हाला मोठे भाग्य आणि समृद्धी मिळू शकते. धनत्रयोदशीपासून दिवाळीचा उत्सव पाच दिवस चालतो. यावर्षी धनत्रयोदशी १० नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी केली जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त (वेळ) १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता सुरू होईल आणि ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०१५७ वाजता संपेल.