Gas Cylinder Blast : मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून जिवीतहानी झालेली नाही. आगीची घटना घडल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग आटोक्यात आणली. पाचही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.
वांद्रे येथील गाझधर बंध मार्गावरील फिटर गल्लीत शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. तिथल्या एका बैठ्या घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यातच आग विजेच्या संपर्कात आल्यामुळे आग वाढू लागली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत ६ वाजून ४० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे :
- निखिल दास (वय ५३)
- राकेश शर्मा (वय ३८)
- अँथनी थेंगल (वय ६५)
- कालीचरण कनोजिया (वय ५४)
- शान सिद्दिकी (वय ३१)
जखमी आगीत होरपळले असून त्यांना नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.