महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठे नेते, कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे आज (शुक्रवार) पहाटे निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदूजा हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनोहर जोशी यांचा परिचय
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ साली रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याशा गावात झाला. त्याचे शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. ध्येयाकडे लक्ष ठेवून त्यांची खडतर सुरुवात झाली. सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा व शिका’ या तंत्राने त्यांनी लहानपणापासूनच संघर्ष केला. वडीलांबरोबर भिक्षुकी करून ते पैसे मिळवू लागले. १९६४ साली त्यांचा विवाह अनघा यांच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगा व दोन मुली असा परिवार होता.
मनोहर जोशी यांचा शैक्षणिक प्रवास
अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे आले. सहत्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण सुरु ठेवले. किर्ती कॉलेजमधून त्यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. वयाच्या २७ व्या वर्षी एम.ए., एल एल.बी. केली. वयाच्या ७२ व्या वर्षी ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर मनोहर जोशी यांनी पी. एच. डी. पूर्ण केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली.
कसा होता मनोहर जोशी यांचा नगरसेवक ते मुख्यमंत्री प्रवास…
समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे १९९९ ते २००२ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
* राजकीय प्रवास…
– दोन वेळा नगरसेवक
– तीन वेळा विधानपरिषद सदस्य
– मुंबई महानगरपालिका महापौर (१९७६-७७)
– दोन वेळा विधानसभा सदस्य
– विरोधी पक्षनेता-विधानसभा (१९९०-९१)
– मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य (१९९५-९९)
– केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)
– लोकसभा अध्यक्ष (१९९९-२००२)
– राज्यसभा खासदार (२००२-२००४)
* साहित्यक्षेत्रातील कार्य…
– डॉ. मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके : १५
– डॉ. मनोहर जोशी यांच्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये इतर लेखकांनी १७ पुस्तके लिहिली आहेत. ऑडिओ बुक्स १० आहेत.
– मुख्यमंत्री असतांना घेतलेले महत्त्वाचे निर्णय…
– मुंबईमध्ये ५० उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा निर्णय
– औद्योगिक गुंतवणुकीसाठी अॅडव्हान्टेज महाराष्ट्र ही जागतिक परिषद
– कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावे म्हणून अॅग्रो ऍडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद
– महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राच्या विकासासाठी ६० जीवनदायी योजना
– १९९४ जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजची स्थापना
* आंतरराष्ट्रीय कामगिरी
कॅनडा, अमेरिका, मॉरीशियस, चीन सारख्या अनेक देशांत भारतीय शिष्टमंडळातून भेट. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, हाँगकाँग, रशिया, इराण, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, झांबिया आणि आखाती देशांसह ४५ देशांना भेटी व अभ्यास दौरे.
* व्यावसायिक जीवन
मनोहर जोशी यांनी २ डिसेंबर १९६१ ला नोकरी सोडून कोहिनूर या नावाने क्लासेसपासून व्यवसायाला सुरुवात केली. नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा त्यामागचा उद्देश होता. आज भारतभर ७० शाखा व दरवर्षी १२ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. कोहिनूर ग्रूप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.
* शिवसेना वाढवण्यात मोठा वाटा
समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे १९६७ पासून शिवसेनेत प्रवेश व राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांचे काम बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या चार पिढ्यांचे काम त्यांनी पाहिले. शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा देखील मोठा वाटा आहे. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते.
* क्रीडा क्षेत्रात भूषवलेली महत्त्वाची पदे
क्रिकेट हा त्यांचा छंद होता. ते ४ टर्मस् मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. तर भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाचे (बी सी सी आय) उपाध्यक्ष होते.