मुंबई : भाजपचा विरोध डावलून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांना सोबत घेण्यास आणि आता विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता.
त्यामुळे अजित पवार गटाकडून अद्याप नवाब मलिक यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, आता नवाब मलिक यांना अजित पवार गटाने एबी फॉर्म दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, हा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याबाबत नवाब मलिक यांना अजून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी सांगितल्यानंतरच नवाब मलिक हे आपल्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडतील. तसे झाले नाही तर नवाब मलिक मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काही वेळातच नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील की नाही, हे स्पष्ट होणार आहे.