मुंबई: प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला. सुदैवाने गाडीतील एअरबॅग्स वेळेत उघडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या अपघातात गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमानंतर गणेश शिंदे, सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा हे तिघे गाडीतून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्स तात्काळ उघडल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली, तर सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली.
जखमी दोन्ही गायिकांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. गणेश शिंदे यांची दुखापत तुलनेने कमी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती चाहत्यांना दिली. त्यांनी तातडीने मदत करणाऱ्या ॲम्ब्युलन्स सेवा, माऊली हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले. तसेच सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे उपचार वेळेत सुरू झाल्याचे सांगितले.
‘मोगरा फुलला’ आणि ‘ज्ञानियांचा राजा’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे गणेश शिंदे आणि त्यांची टीम रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.






