ठाणे: आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीची महाविकास आघाडीची टक्कर होणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात बरेच राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटात गेले आहेत. अशावेळी खासदार शरद पवार हे एकाकी पडल्याची भावना झाल्याने एकनाथ शिंदे गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
पांडुरंग बरोरा हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु, २०१९ मध्ये बरोरा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दौलत दरोडा यांना विधानसभेची उमेदवारी दिली. २०१९ च्या निवडणुकीत दौलत दरोडा यांनी बरोरा यांचा पराभव केला होता. आता आमदार दौलत दरोडा हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे पांडुरंग बरोरा यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा हे गुरुवारी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.