नवी दिल्ली: महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची तयारी शुक्रवारी निवडणूक आयोगाने सुरू केली. या तीन राज्यांसोबतच जम्मू- काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात देखील निवडणूक घेण्याची आयोगाची तयारी आहे. आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड व जम्मू-काश्मीरमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्रता तारीख १ जुलै २०२४ निश्चित करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी १ जानेवारी ही पात्रता तारीख निश्चित करून अद्ययावत करण्यात आल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मतदार याद्या अद्ययावत करण्यासह निवडणुकीच्या संभाव्या तारखा कळवण्यास सांगितले आहे. १ जुलैच्या कट ऑफ तारखेसह मतदार याद्या अद्ययावत करण्यात याव्यात. २५ जुलै रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर मतदारांना ९ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवता येतील. २० ऑगस्ट रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.