मुंबई : उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गोरेगावातील नेस्को सेंटर येथे दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटाकेबाजी करत विरोधकांवर तर निशाणा साधलाच पण यावेळी भाषणाचा केंद्रबिंदू होता तो शेतकरी. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली असून, पुरग्रस्तांना सर्वोपरि मदत करणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, ”महापुरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. पण शेतकरी बंधू-भगिनींनो तुम्ही धीर सोडू नका. टोकाचे पाऊल उचलू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत. तुमचे जीवन जे उद्ध्वस्त झालंय त्याला उभारी देण्याचे काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना, महायुती सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचे कष्ट, वेदना, दुःख मला माहीत आहेत. शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल. असे विश्वास त्यांनी दिला.

यंदा बळीराजाचे दुःख मोठे आहे. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीचा हात देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. 'जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे प्रकट' हे समीकरण असून यावेळीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख पाहिले असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
या महापुराच्या तडाख्यात… https://t.co/IbEpNJJyDy pic.twitter.com/rarpVxLcnj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2025
आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत. सरकार त्यांच्या मागे आहे. पूर्वी दुष्काळ पडला, पूर आला त्या त्यावेळेस अन्नधान्य, जीवनाश्यक वस्तू, जनावरांना चारा देण्याचे काम शिवसेनेने केले. आताही कोणत्याही अटी, शर्ती बाजूला ठेवून मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांसह आम्ही ठरवलंय, बळीराजाला मदतीची हात, आधार दिला पाहिजे. संकट मोठे आहे. लोकं आम्हाला सांगत होती, अनेक वर्षांत आम्ही इतका पाऊस पाहिला नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय. अशा परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

पुढे त्यांनी सर्वात मोठी आणि हृदयस्पर्शी घोषणा करत अतिवृष्टीमुळे ज्या कुटुंबांतील मुला-मुलींची लग्नं ठरलेली आहेत आणि जे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, त्या सर्वांची लग्नं लावण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना पक्ष उचलणार असल्याचं सांगितलं. शिंदे यांनी ही जबाबदारी घेऊन, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ‘आर्थिक बोजा’ तर कमी केलाच, पण त्यांना मोठा भावनिक आधारही दिला आहे.
पुढे त्यांनी शिवसैनिकांना स्पष्ट निर्देश दिले की, सगळे मतभेद विसरून सध्या केवळ एकाच कामाला लागा ते म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणे. जिथे जिथे मदत करता येईल, तिथे शिवसैनिकांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.







