मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने कोण एकाची विकेट काढणार याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, महायुतीने विधानपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांचा विजय खेचून आणत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिल्याने त्यांना फटका बसल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवला. परंतु, निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच अजित पवार गटाची काही मते फुटणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र, अजित पवारांची मते फोडण्यात विरोधकांना अपयश आल्याचे विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर मते फुटल्याने एक प्रकारे महाविकास आघाडीलाच या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेला दमदार यश मिळालेल्या काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.