Dr Nitin Karir : मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक हे निवृत्त झाले आहेत. डॉ. नितीन करीर हे 1988 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांचा कालावधी हा 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळू शकते.
राज्य सरकारने सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून 30 एप्रिल ते 31 डिसेंबर या कार्यकाळात जबाबदारी सांभाळली. डॉ. नितीन करीर यांनी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला. नितीन करीर यांची सेवानिवृत्ती 31 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्याच दरम्यान लोकसभा निवडणुका असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
डॉ. नितीन करीर हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. आता मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. डॉ. करीर यांनी यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.
महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर यांनी एमबीबीएस पदवी घेतली. त्यांची 1988 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.