मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. सरकारने आरक्षणासंदर्भातील ड्राफ्ट पाठवला असला, तरी वारंवार आपली फसवणूक होत असल्याचा आरोप करत आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी दुपारी एक वाजल्यानंतर मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

नारायणगडाचा अपमान होऊ नये आणि महंतांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी आपण सलाईन घेतल्याचे जरांगे यांनी सांगितले. प्रकृती ठीक नसली तरी मुंबईला जाण्याचा निर्णय कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या वेशीवर जाऊन थांबणार असून, आझाद मैदानावर आंदोलन करू दिले नाही तर मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग असेल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी रस्त्यात गर्दी करून वेळ घालवू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. सध्या प्रत्येकाने आपापली गावे सांभाळावीत. मुंबईत कधी आणि कसे यायचे, याची तारीख आणि नियोजन आपण स्वतः सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातही असंतोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना जरांगे यांनी आपण आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचे सांगितले. मुंबईकडे जाताना कोणताही अनावश्यक मुक्काम न करता थेट मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. प्रकृती ठीक नसल्यामुळे सर्वांनी आपले ऐकावे आणि गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. मात्र, आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णयाशिवाय आपल्याला काहीही नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. आता त्यांच्या मुंबईकूचच्या घोषणेनंतर राज्य सरकार यावर काय भूमिका घेते आणि पुढील काळात आंदोलनाची दिशा काय राहते, याकडे लक्ष लागले आहे.







