पुणे : शेतजमिनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वापरावरून झालेल्या वादातून दोन भावांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केल्याची घटना दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी परिसरात घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात महेश हनुमंत गायकवाड आणि त्यांचा भाऊ महेंद्र गायकवाड हे दोघे जखमी झाले आहेत. दोघेही तळेवाडी, वडकी, सासवड रस्ता परिसरात राहतात.

याबाबत महेश आणि महेंद्र यांचे वडील हनुमंत वामन गायकवाड (वय ६३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नितीन मुरलीधर फाटे, अक्षय दादा फाटे, अंकुश राजाराम फाटे आणि अमोल सुंदर फाटे (सर्व रा. तळेवाडी, वडकी, सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवे घाटाच्या पायथ्याशी मस्तानी तलावाजवळ तळेवाडी गाव आहे. या भागात गायकवाड कुटुंबीय तसेच आरोपींची शेतजमीन आहे. शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वापरावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

११ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास महेश आणि महेंद्र हे शेतात काम करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी दोघांना रस्त्यावर अडवून शेताकडे जाण्यास विरोध केला. हा रस्ता वापरल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर वाद वाढला आणि आरोपींनी दोन्ही भावांवर ऊस तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महेश आणि महेंद्र दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार फडतरे करत आहेत.







