मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आलेली असताना रश्मी शुक्ला यांना रजेवर का पाठवण्यात आले? असा सवाल उपस्थित करत सेवानिवृत्त झालेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा सरकारी सेवेत सामावून घेण्यास मनाई करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या वतीने अॅड. रवी जाधव यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर, सेवानिवृत्तीनंतर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांना कायम ठेवल्याने काँग्रेसने याला आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने पदावरून हटवण्याचे आदेश दिले. मात्र, राज्य सरकारने शुक्ला यांना रजेवर पाठवून पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची तात्पुरती नियुक्ती केली, यालाच काँग्रेस प्रवक्ते अतुल लोढे यांनी याचिकेत आक्षेप घेतला आहे.