डोंबिवली : ‘लव्ह इज इन दी एयर’ असं म्हणतात. या एका वाक्यामुळे लोक आपआपल्या सोयीने प्रेम या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढतात. मग त्यात प्रेमातला पुढचा व्यक्ती प्रेम स्विकारायला तयार आहे की नाही याचा विचार करत नाही. अनेकवेळा त्याचे उलटे परिणामही होतात. डोंबिवलीत एका तरुणाला याचा चांगलाच प्रत्यय आला आहे. या तरुणाने एका तरुणीला रस्त्यात अडवत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनी चोपचोप चोपला. प्रीतम गायकवाड असे या रोड रोमियोचे नाव आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपी तरुणाची मजल इतकी वाढली की तो डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीची छेड काढत होता. पण त्याच्या या कृत्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याला चांगलाच मार दिला.
नेमकं काय घडलं?
आजदेपाडा परिसरात राहणारी महिला रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती. प्रीतम गायकवाडने तिचा पाठलाग करत, अंधारात तिचा गळा दाबला. तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड सुरू केला. महिलेची आरडाओरड एकूण स्थानिकांनी धाव घेतली. मात्र लोकांची गर्दी पाहून तो पळून जात होता. स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. यावेळी तरुणांनी प्रीतम गायकवाडला चांगलाच चोप देत धडा शिकवला. त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.