Disha Salian Case : मुंबई : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिंदे सरकार एसआयटी चौकशी करणार आहे. यात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहेत. दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने भाजपमधील काही आमदार करत होते. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे नेमके कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या एसआयटी चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची भाजपच्या काही आमदारांकडून सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून 2020 या दिवशी मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू झाला. तिचा 9 जून 2020 ला संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मुंबईच्या मालाडमधल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली कोसळून तिचा मृत्यू झाल्याची माहिती तेव्हा समोर आली. नंतर तिच्या मृत्यूचा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं गेलं. याच प्रकरणात आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी केली आहे. कोर्टाने कोणताही निर्देश देण्यापूर्वी आदित्य यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटमधून करण्यात आली आहे.