मुंबई : पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. आता भारताचे तिसरे पदक ठरले आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदकावर नाव कोरल आहे. स्वप्नील कुसाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्वप्नील कुसाळे आणि त्याच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाना फोन करत अभिनंदन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुसाळे कुटुंबियांना एक आश्वासनदेखील दिलं असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांच आश्वासन नेमकं काय?
ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवणाऱ्या स्वप्नील कुसाळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमधील कांबळवाडी गावचा आहे. त्याच्या या मूळगावी देखील जल्लोषा वातावरण आहे. नेमबाज स्वप्नील कुसाळे याने केलेल्या कामगिरीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केल आहे. स्वप्नील हा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना दिलं.
मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केलं अभिनंदन..
कुसाळे कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या 12 वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळालं आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
तसेच स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांची आठवण झाली. स्वप्नीलच्या या कामागिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह, आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कांबळवाडी ते पॅरीसमध्ये ऑलिम्पिकच्या पदकाला गवसणी हा स्वप्नीलचा प्रवास क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.