-गणेश सुळ
केडगाव : धनगर आरक्षणाचा मुद्दा तापत चालला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मंत्रालयात जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. दरम्यान पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढले आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करत सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आज थेट मंत्रालयात पोहोचून आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार आपले निवेदन स्वीकारत नाही, असा आरोप करत त्यांनी मंत्रायलात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी या सुरक्षा जाळीवर उतरून आंदोलकांना बाहेर काढलं. दुसरीकडे याच मुद्यावरून आंदोलकांनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
धनगर आरक्षणाचचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. याच मुद्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या धनगर समाजातील कार्यकर्त्यानी अनेक वेळा सरकारला निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार आपले निवेदन स्वीकारत नाही, असा आरोप धनगर समाज करत आहे.
धनगर बांधवांनी वर्षा निवासस्थानासमोर घोषणाबाजी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर तात्काळ काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.