मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाकडून शेअर करण्यात आला, आणि राजकीय वर्तुळात प्रचंड एकच खळबळ माजली होती. त्यामुळे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का? या चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आज अखेर यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर एखाद्याला यायचे असेल, तर तो व्हिडीओ टाकून येतो का? हा किती वेडेपणा आहे, असं म्हणत फडणवीस यांनी मी पुन्हा येईनच्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नसेल. जर एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? एखादा व्हिडीओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही. आगामी निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होणार आहेत.