मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा (श्वसनाशी संबंधित आजार) त्रास होत असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे बुधवारी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना पवार उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रपती कार्यालयाला त्याबाबत कल्पना देण्यात आली होती, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.
पवार हे गेल्या काही महिन्यांपासून जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाथ्यर्थ्यांची भेट, शासकीय बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने सातत्याने राज्यात विविध भागांचा दौरा करत आहेत. बुधवारी ते मुर्मू यांच्या कार्यक्रमात सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र, ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाल्याने त्यांना उदगीरचा दौरा रद्द करावा लागला. प्रकृतीत सुधारणा होताच ते पुन्हा दौर सुरू करतील. दरम्यानच्या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थानातून शासकीय कामकाज पाहतील, असेही कार्यालयाने सांगितले.