मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव किसनराव बबनराव पलांडे यांची नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीसाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. पलांडे हे ज्या तारखेला प्रतिनियुक्तीच्या पदावर रूजू होतील, त्या तारखेपासून प्रतिनियुक्तीच्या सेवेचा प्रारंभ होईल आणि ती सेवा ज्या तारखेला ते आपल्या शासकीय पदाचा कार्यभार पुन्हा स्विकारतील, त्या तारखेला समाप्त होईल. दरम्यान, त्यांची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने शासनाला आवश्यक वाटली तर प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वीच कोणत्याही वेळी त्यांना परत बोलावून घेण्याचा अधिकार शासनाला राहणार आहे.
ही सेवा स्वीयेतर नियोक्त्याला आवश्यक वाटली नाही तर त्यांना मुळ विभागाकडे परत पाठविण्याची मुभा त्यांना असणार आहे. मात्र, परत पाठविण्यापूर्वी स्वीयेतर नियोक्त्याने शासनाला तीन महिन्यांची नोटीस देणे बंधनकारक आहे. दरम्यान, मूळ विभागाकडे परत जाण्याचा त्यांचा उद्देश असल्यास, कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस शासनाला देणे आवश्यक आहे. तरच त्यांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील.