मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यासाठी ठराव संमत करावा आणि तो केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी सभागृहात केली. देशात आणि राज्यात सध्या भाजपाचे सरकार असून सावरकरांच्या विचारांशी वैचारिक जवळीक असतानाही त्यांना अद्याप सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यासंदर्भात संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. ठराव सभापतींकडे मांडून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने औपचारिक प्रस्ताव आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र 2019 मधील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की, ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी औपचारिक शिफारसीची आवश्यकता नसते. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यावेळी नमूद केले होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेतून आता ठराव पुढे सरकल्यास सावरकरांच्या ‘भारतरत्न’ प्रश्नावर नव्याने राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.







