नवी मुंबई : नवी मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईची रबाळे येथे चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा पोलीस तपास करत होते. त्यानंतर विक्रीसाठी चायनावरून आणलेल्या १२ लाखांचा श्वान मृत्यूमुखी पडल्याने मोठे नुकसान झाले. ते नुकसान भरून काढण्यासाठी चुलत भावानेच घरी चोरी केल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रबाळे येथे रक्षाबंधनाला मंदिरात गेलेल्या रणजितसिंग राजपुरोहित यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरट्याने ३७ तोळे सोनं, दीड किलो चांदी आणि साडेसात लाख रोख रकमेची चोरी केली होती. दरम्यान श्वान आणि मांजर इम्पोर्ट करुन त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीने चायनावरून १२ लाखा रुपयांचा श्वान मागवीला होता. परंतु, तो श्वान मृत्यूमुखी पडल्याने व्यवसायात मोठं नुकसान झाल्याने आरोपीने आपल्याच चुलत भावाच्या घरी चोरी केल्याचे उघड झाले आहे.
आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी..
दरम्यान, घटना समोर आल्यानंतर रबाळे पोलिसांनी तपास सुरु केला. यात एका स्कूटीच्या आधारे आरोपी करण राजपुरोहित याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीसांनी चोरी केलेला ३४ लाख ८४ हजार किंमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीची अधिक चौकशी करण्यात येत आहे.