अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीजवळील काकोळे गावाजवळ डोंगरावरील झाडाझुडपांत एका ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची पाच ते सहा दिवसांपूर्वी ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली असून, पावसामुळे मृतदेह पूर्णपणे कुजला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास पथके सक्रिय केली आहेत.
अंबरनाथ येथील आयुध निर्माण परिसरातील भर चौकात एका २५ वर्षीय तरुणाची रविवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी निघृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी शहरात तरुणीची गळा आवळून निघृण हत्या करण्यात आल्याची आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्वेतील आनंद नगर एमआयडीसीपासून जवळ असलेल्या काकोळे गावाजवळील डोंगरावर काही तरुण खेकडे पकडण्यासाठी गेले होते. त्यांना झुडपांत एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. या तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या करत तिचा मृतदेह डोंगरावरील झाडाझुडपांत टाकण्यात आला आहे. या तरुणीच्या अंगावर मेहंदी रंगाचा सलवार, हिरव्या रंगाची ओढणी, लाल रंगाची चप्पल आणि हातात लाल मनी असलेली धातूची अंगठी घातलेली आहे. अद्याप या मृत तरुणीची ओळख पटलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.