Crime News: नवी मुंबई : नवी मुंबईत एका धक्कादायक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणाची हत्या (Murder) केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावाजवळील शेतातील विहिरीत एक मृतदेह आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला. अवघ्या 3 दिवसांत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा केला.
तपासात समोर आले की, नवी मुंबईतील कळंबोली परिसरात संबंधित तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह कारमधून सुमारे 191 किलोमीटर अंतर पार करत लोणंदजवळ आणण्यात आला. सुखेड गावाच्या हद्दीत मृतदेह जाळून विहिरीत टाकण्यात आला होता, असा आरोप आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू भिसे हा रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तो कळंबोली येथील रोडपाली भागात राहत होता. त्याची ओळख सोमनाथ बोबडे या तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर भिसे यांना आपल्या पत्नीचे आणि सोमनाथचे संबंध असल्याचा संशय आला. या संशयातून भिसे यांनी काही मित्रांच्या मदतीने सोमनाथची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.






