लोणी काळभोर, ता. 11: शेतजमिनीवर बळजबरीने ताबा घेऊन लागवड करून जेष्ठ महिलेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राहिंजवस्ती परिसरात असलेल्या गट क्र. 112 मध्ये 26 जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतजमिनीच्या वादातून ज्येष्ठ महिलेवर अन्याय झाल्याचा आरोप होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुरेश अनंता जागडे, सौरभ सुरेश जागडे, रमेश अनंता जागडे, दत्ता अनंता जागडे, साहील दत्ता जागडे व यश रमेश जागडे (सर्व रा. कदमवाकवस्ती, संभाजीनगर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वीदेखील आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अलका श्रीहरी जागडे (वय 68, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका जागडे यांचे पती स्व. श्रीहरी जागडे यांनी सन 2000 मध्ये गणेश गेनु जागडे यांच्याकडून गट क्र. 112 मधील सुमारे 1.20 हेक्टर जमीन 99 वर्षांच्या कराराने घेतली होती. तेव्हापासून सदर जमीन अलका जागडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असून गेल्या अनेक वर्षांपासून ऊसासह विविध पिकांची लागवड करण्यात येत होती. ऊसाचे उत्पादन राजगड, यशवंत सहकारी साखर कारखाना तसेच खासगी साखर कारखान्यांना पुरविण्यात आले असून त्याबाबतच्या पावत्याही त्यांनी पोलिसांकडे सादर केल्या आहेत.
दरम्यान, मार्च 2025 मध्ये ऊस तोडल्यानंतर जमीन मशागत करून पुढील लागवडीची तयारी करण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे लागवड रखडली. डिसेंबर 2025 मध्ये पुन्हा संपूर्ण क्षेत्राची नांगरणी करून ऊस लागवडीची तयारी सुरू होती. तेव्हा 26 जानेवारी रोजी आरोपींनी ट्रॅक्टर घालून जबरदस्ती कोळपणी करत शेतात पालक व कांद्याची लागवड केली. त्यानंतर फिर्यादी महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी अलका जागडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहाही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 329 (3), 351 व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत.







