Crime News : मुंबई : मुंबईत (Mumbai) एका 29 वर्षीय महिलेच्या लैंगिक शोषणाचा (Sexual exploitation) गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली आहे. या महिलेला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ (Video) काढण्यास भाग पाडून ते व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोनिया गुप्ता, तिचा पती सोनू गुप्ता आणि इतर 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पीडित महिलेने ऑगस्ट 2025 मध्ये समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींनी अनेक दिवस तिच्यावर दबाव टाकत तिचे अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने रेकॉर्ड केले. त्यानंतर तिची कोणतीही परवानगी न घेता हे व्हिडिओ विविध पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. या प्रकारामुळे तिला मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला, असे तिने पोलिसांना सांगितले.

महिलेच्या जबाबानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट, महिलेच्या खासगी आयुष्याचा भंग आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील मजकूर प्रसारित करणे अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा समावेश आहे. या कलमांवरून गुन्ह्याचे गांभीर्य स्पष्ट होते.
सध्या या प्रकरणातील सर्व 8 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक माहितीचा आधार घेतला जात आहे. तसेच, अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ तात्काळ हटवण्यासाठी पोलिसांकडून संबंधित वेबसाइट्स आणि वेब प्लॅटफॉर्मशी संपर्क साधण्यात येत आहे.
डिजिटल फॉरेन्सिक तज्ञ या प्रकरणाचा तपास करत असून ऑनलाइन पसरवण्यात आलेल्या सामग्रीचे स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.







