Pune Crime: पुणे : पुण्यातील (Pune) खराडी परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून (Murder) करून फरार झालेल्या पाच गुन्हेगारांना लातूर पोलिसांनी अटक केल्याने मोठी कारवाई यशस्वी ठरली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच बंदोबस्तादरम्यान संशयावरून तपास करताना पुण्यातील खुनाचा उलगडा झाला.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चार्ली पथक भांबरी चौक ते साई नाका रिंग रोड परिसरात गस्त घालत होते. गस्तीदरम्यान एका पेट्रोल पंपाजवळ अंधारात झाडाखाली पाच तरुण बसलेले दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हे सर्व तरुण 18 ते 20 वयोगटातील होते.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. काही वेळातच पुणे पोलिसांकडून माहिती मिळाली की हे पाचही जण 24 जानेवारी रोजी वाघोली-खराडी भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात फरार होते. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर गुन्हा दाखल आहे.
आरोपींची नावे समोर
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कैलास विठ्ठल राठोड, गणेश चंद्रकांत कट्टे, सुशील सुभाष कदम, करण विठ्ठल तुरे आणि रोहित विकास गायकवाड अशी आहेत. हे सर्व आरोपी पुणे शहरातील विविध भागात राहणारे आहेत. रात्री सुमारे 1 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण करून लातूर पोलिसांनी पाचही आरोपींना पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.
या खुनामागील घटना अत्यंत धक्कादायक आहे. वाघोली परिसरातील एका सोसायटीमध्ये मित्राच्या घरी जमलेल्या तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात पाच मित्रांनीच 21 वर्षीय विकी विजय दिवटे याची चाकूने गळा चिरून हत्या केली. ही घटना गुन्हे शाखेच्या कार्यालयाजवळ घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







