मुंबई : सध्या राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे पाप आमच्या माथी नको असं म्हणत फडणवीस यांनी संबंधित जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
शिंदे सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. याविषयी शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. राज्यात कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे. आता ते त्याविरोधात आंदोलन करत आहे. कंत्राटी भरती कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप असून त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा प्रश्न करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
दरम्यान राज्यात कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या सराकरमध्ये कंत्राटी भरती झाली. 2010 मध्ये अशोक चव्हाणांनी जीआर काढला. त्यामध्ये सहा हजार कंत्राटी पदाचा समावेश होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात कंत्राटी शिक्षण भर्तीचा जीआर काढण्यात आला. 2014 मध्ये पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला. 1 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला, 15 वर्षाकरता कंत्राटी भर्तीसाठी एजन्सी तयार करण्यात आली. आता आमचं सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी यामध्ये लक्ष घातलं. कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात ते आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.