मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश मिळाले आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या खान यांच्याऐवजी पक्षाने मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने राज्यात अल्पसंख्याक समाजातील एकही उमेदवार दिला नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यातील आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा झाली. त्यावेळी राहुल यांनी नसीम खान यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर काँग्रेसने नसीम खान यांना स्टार प्रचारक यादीत स्थान दिले. त्याचसोबतच, पुण्यातील काँग्रेसचे जुनेजाणते नेते आबा बागुल यांचीही नाराजी दूर करत त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. आमदार रवीद्र धंगेकर यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर आबा बागुल नाराज झाले होते. त्यातून त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात जाऊन भेट घेतली होती; पण भाजपने त्यांना फार महत्त्व दिले नव्हते. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बागुल यांच्याशी संपर्क साधत झाले गेले विसरून काँग्रेस विचारांसोबत पुन्हा काम करावे, अशी विनंती केली. त्यानंतर बागुल यांची नाना पटोलेंनी प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावली. त्यानंतर बागुलांनी धंगेकर यांच्यासाठी सभा घेत प्रचार सुरू केला आहे.