मुंबई : जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आहेत. अशातच काँग्रेस पक्षाकडून प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजूनही वेळ गेली नसून, तुम्हाला जागा पाहिजेत त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता काँग्रेसने आंबेडकरांना नवीन ऑफर दिली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे की, “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवून केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी, असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती यावेळी अनिस अहमद यांनी दिली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यामध्ये ते पराभूत झाले होते. या निवडणुकीत देखील प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाही. उलट त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होईल, असे आम्ही त्यांना कळविले आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून, ते राज्यसभेत पाठवण्या संदर्भात आम्ही दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचेही अनिस अहमद यांनी म्हटले आहे.