मुंबई: मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षाही आहेत. एनडीएने अद्याप येथून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. भारतीय जनता पक्षाकडून पूनम महाजन या येथील विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या खात्यात आली आहे. वर्षा गायकवाड यांनी जागावाटपाबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच काँग्रेसने त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक मुंबईची दक्षिण मध्य जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. यावर वर्षा गायकवाड प्रचंड संतप्त झाल्या होत्या. त्याचा निरोप त्यांनी दिल्लीला दिला होता. मुंबईतील सहापैकी केवळ दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या, काँग्रेसला किमान तीन जागा मिळाल्या पाहिजेत, असा वर्षा गायकवाड यांची मागणी होती. जागावाटपाची स्थिती आणखी चांगली होऊ शकली असती, असे मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले होते. परंतु, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तसे करू शकले नाहीत. ज्या जागा जिंकता येत नाहीत, त्या जागा काँग्रेसला दिल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.