मुंबई : मुंबईकरांना गुलाबी थंडीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. अशातच आता मुंबई शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नाताळकाळात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुलाबी थंडी अनुभवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांवर गुरुवारी आभाळछाया पसरली होती. त्यामुळे मुंबईकरांना थंडीची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहराच्या वातावरणात आर्द्रता जाणवत आहे, त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव आणखी काही दिवस तरी मुंबईकरांना घेता येणार नाही. पश्चिमी प्रकोप प्रणालीची निर्मिती होत असल्यामुळे वातावरणात बदल झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली.
वातावरण बदल होत असल्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.१ कमाल तापमान नोंदले गेले आहे. कुलाबा येथील तापमानात २४ तासांत १.२ अंशानी वाढ झाली. या तापमानात दोन दिवसांत थोडी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.