पालघर: “छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी फक्त राजे नाहीत. तर ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये जी घटना घडली, त्याबाबत मी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची डोके झुकवून माफी मागतो. आम्ही राजकारणासाठी कधीही महापुरुषांचा वापर करत नाही”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ३०) वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी दिली.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले होते. परंतु, केवळ आठ महिन्यातच शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. विरोधक राज्य सरकारवर अक्षरशः तुटून पडले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली. ते म्हणाले की, माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी फक्त राजा नाहीत. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवताची माफी मागतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात, त्यांच्या काळजाला या घटनेमुळे ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवताची पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही”, अशी भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.